कलाकृतीचे नाव :- पेंडंट / पदक 
top of page

कलाकृतीचे नाव :- पेंडंट / पदक 

लागणारे साहित्य :- नारळाची करवंटी, व्हाईट पेन्सिल किंवा खडू, करवत पट्टी (आरी/हॅकसा ब्लेड), हार्ड पॉलिश पेपर 80 नंबर, सॉफ्ट पॉलिश पेपर 120 नंबर, एम-सिल, फेविक्विक, बारीक लवचिक तार अंदाजे 5 सेमी, अक्रेलीक रंग किंवा तैल रंग, पेंटिंग राउंडब्रश नंबर 5 ,रंगीत दोरा, कातर किंवा पकड इत्यादी.


कृती :- प्रथम आपल्याकडे उपलब्ध असलेल्या नारळाच्या टाकाऊ करवंटीचे निरीक्षण करा.तिच्यापासून आपणास काय तयार करता येईल याचा कल्पक विचारातून आपणांस अनेक कल्पना सुचतील.करवंटीचा आकारावरून आपण यातून कोणती नवनिर्मिती करू शकतो हे समजेल.

मात्र आता आपणांस करवंटीपासून गळ्यातील शोभिवंत पेंडंट म्हणजे पदक तयार करण्यासाठी करवंटीचा पुनर्वापर करावयाचा आहे.त्यासाठी करवंटीवर पेंडंट/पदकासाठी आपणांस आवडतील ते त्रिकोणी,चौकोनी,आयात, वर्तुळाकार यापैकी जो वाटेल तो आकार व्हाईट पेन्सिल किंवा खडूने करवंटीवर गिरवून घ्या. करवंटीवर रेखाटन केलेला आकार जो आपणास हवा आहे तो आता करवत पट्टीच्या साहाय्याने कापून घ्या. आपण निश्चित केलेल्या आकाराप्रमाणे थोड्या प्रयत्नांनी करवंटीचा हवा असलेला आकार आपणाकडे आता तयार असेल.मात्र पेंडंट किंवा पदकासाठी कापून घेतलेला भाग-आकार आपणांस काहीसा ओबडधोबड वाटत असेल तर हार्ड पॉलिश पेपरचा छोटासा तुकडा घेऊन करवंटीच्या सर्व कडा हाताने व्यवस्थित घासून घ्या.घासल्यावर सर्व कडा व्यवस्थित झालेल्या आपणास दिसतील.त्यानंतर आता कापून घेतलेल्या करवंटीच्या भागावरील असणारे तंतू,खरखरीतपणा देखील निघून गुळगुळीत होण्यासाठी पुन्हा पॉलिश पेपर घेऊन करवंटीचा भाग बाहेरच्या बाजूने घासा.घासता घासता हळूहळू करवंटीवरील खरखरीतपणा निघून जात असलेला आपणास दिसेल.थोड्या अधिक प्रयत्न आणि श्रमाने करवंटीवरील बराचसा खरखरीतपणा दूर झाल्याचे आपणास दिसेल.आता सॉफ्ट पॉलिशपेपर चा छोटा तुकडा घेऊन पुन्हा आकारावर घासा.सॉफ्ट पेपरमुळे पूर्वीपेक्षा करवंटी अधिक गुळगुळीत झाल्याचे दिसून येईल.घासता घासता आपणांस जेंव्हा वाटेल की आता करवंटीचा आपण कापून घेतलेला ,घासून घेतलेला आकार आपणास हवा तसा अगदी गुळगुळीत झाला आहे असे वाटेल तेंव्हा घासकाम थांबवा.त्याच पेपरने करवंटीचा भाग पाठीमागून देखील घासून स्वच्छ करा.आता बारीक, काहीसा लवचिक असा तार घ्या(अंदाजे 5 सेमी).आपण घासून गुळगुळीत केलेल्या पेंडंटला कोणत्याही कडेच्या वरच्या टोकाच्या ही तार चिकटवून घ्यायची आहे त्यासाठी आधी करवंटीवरच्या कडेवर आपला बिंदू निश्चित करा.आता लवचिक बारीक अशी तार घ्या आणि आपल्या पेंडंटची दर्शनी बाजूसोडून मागील बाजूला आवश्यक तेवढी तार कातरने किंवा पकड ने तुकडा करा.तार इंग्रजी U अक्षरासारखी ती तार करून घ्या आणि पेंडंटच्या पाठीमागच्या बाजूला U आकाराची दोन्ही टोके जुळवून घेऊन पेंडंटच्या वरच्या टोकाच्या मध्यभागी दोन्ही टोके फेविक्विकने चिकटवून घ्या.त्यानंतर एम-सिल चे दोन्ही काळे-पांढरे भाग आवश्यकतेनुसार घेऊन त्यांना एकजीव करा आणि फेविक्विक ने जिथे तारेची दोन्ही टोके जुळवून आपण चिकटवून घेतली आहेत तिथे एम-सिल देखील चिकटवा म्हणजे हा जोड घट्ट राहील.

आता पेंडंटवर आपल्याला आपल्या कल्पकता,सृजनशीलता यानुसार हवी असलेली डिझाईन किंवा चित्ररूपी नक्षी,आकार,अक्षरे,नाव इत्यादी पेंटिंग ब्रशने तैल रंग किंवा अक्रेलीक रंगाचा उपयोग करून रेखाटन करा.रंग कोरडे होईपर्यंत उन्हात सुकू द्या.त्यानंतर रंगीत दोरा साधारणपणे आपल्या गळ्याच्या मापात बसेल इतका (अंदाजे 18 इंच) कातर ने कापून घ्या.पेंडंटच्या टोकाकडील भागात हा दोरा व्यवस्थित अडकून वरती गाठ मारा.झाली करवंटीपासून आकर्षक असे पेंडंट तयार.!!

टाकाऊ करवंटीचा कौशल्यात्मक पुनर्वापर करून अल्पखर्चात आपण करवंटीपासून शोभिवंत कलाकृतीची निर्मिती म्हणजे पेंडंट तयार करू शकतो.तयार केलेले पेंडंट आपण आपल्या मित्रमैत्रिणींनच्या वाढदिवसानिमित्त भेट म्हणून देऊ शकतो, बॅज म्हणून वापरू शकतो. या पद्धतीने तयार केलेल्या पेंडंटमध्ये आपण आपल्या कल्पनेनुसार अधिकाधिक आकर्षकता वाढवू शकतो.

कृती करतांना घ्यायची काळजी :- करवत पट्टी (आरी/हॅकसा ब्लेड) ने करवंटी कापताना हाताच्या बोटांना इजा होणार नाही याची दक्षता घ्यावी.10 वर्षाखालील बालकांनी आपल्या शिक्षक/पालक यांच्याकडून करवंटी कापून घ्यावी.त्याचप्रमाणे फेविक्विक चा वापर करतांना देखील काळजीपूर्वक करावा.

छायाचित्रात दाखवलेली कलाकृती ही नमुनादाखल तयार केलेली असून दिलेल्या कृतीनुसार आणि कोणत्याही मशीनचा वापर न करता हस्तकलाकौशल्यातून तयार केलेली आहे.सातत्य व कौशल्य यातून अशी कलाकृती साकार होऊ शकते.आपणास याप्रमाणे कृती करून अधिकाधिक सुबक,रेखीव,आकर्षक अशी कलाकृती सहज साकारता येईल.

130 views0 comments
bottom of page