आता आत्तापर्यंत स्त्री आणि आरोग्य याचा मोकळ्या मनाने एकत्रित विचार केलाच गेला नाही. मात्र अलिकडे अगदी बोटावर मोजणाऱ्या महिला ह्या जागृत झालेल्या दिसतात .हे प्रमाण वाढल्यास समाज निरोगी व्हायला लागेल .त्यासाठी लेखनाचा खटाटोप !!
आरोग्य म्हणजे केवळ रोगाची अनुपस्थिती नव्हे तर; शारीरिक, मानसिक व सामाजिक कल्याणकारी अवस्था म्हणजे सर्वांगीण आरोग्य अथवा पॉझिटिव्ह हेल्थ ,अशी व्याख्या जागतिक आरोग्य संघटनेतर्फे करण्यात आली . महिला आरोग्य या विषयाची मांडणी होणे ही काळाची गरजआहे. आरोग्यपूर्ण तंदुरुस्तीसाठी आहार-विहार, व्यायाम, मनःशांती ही त्रिसुत्री महत्वाची आहे .मात्र शहरी व ग्रामीण स्त्रियांच्या जीवन पद्धतीत आमूलाग्र फरक जाणवतो .उपवास करणे हे जणू स्त्रियांचे आद्य कर्तव्य! ग्रामीण स्त्रिया या उपवासाच्या विरोधात ऐकायला देखील तयार नाहीत .महिण्यातून आठ ते दहा दिवस उपवासाचे वार असतात . गाव खेड्यात काय तर शहरात देखील उपवास करणाऱ्या महिलांचे प्रमाण लक्षणीय आहे. चुकीच्या पद्धतीने वारंवार उपवास करायचे आणि संतुलित आहाराचा अभाव असल्यामुळे महिलांच्या अनेक शारीरिक समस्या उद्भवतात .या महिलांना पहिल्यांदा स्वतःवर प्रेम करायला शिकावे लागेल .त्यातून एक दृष्टी मिळेल. स्वतःकडे दुर्लक्ष करणे म्हणजेच संसार नेटका करणे नव्हे तर ;याला बेभरवशाचे जगणे म्हणतात, कारण घरातील गृहिणी किंवा महिला निरोगी असेल तरच ती नीट घर सांभाळू शकते .सर्व सदस्यांकडे लक्ष पुरवू शकते .संतुलित आहाराचा अभावामुळे विविध तक्रारी सुरू होतात .पित्त वाढणे ,डोकेदुखी ,वजनवाढ, हात पाय ओढणे ,अशक्तपणा वाटणे अशा तक्रारी महिलांकडून सतत केल्या जातात .
महिलावर्गाला एक अतिशय चुकीची सवय असते ती सकाळी नाश्ता कशाला ,थेट जेवनच करू. सर्व कामे आटोपली की निवांत जेवण. तोपर्यंत दोन-तीनदा चहा होतो. कामे आटपून दुपारला जेवण घेतात ,तोपर्यंत पोट खाली त्यामुळे व्याधी वाढतात .स्त्रिया शिळेपाके खातात. स्त्रियांनी सर्वांकरता ताजे अन्न द्यावे आणि उरलेसुरले शिळे अन्न घरातील गृहिणींनी खाण्याचा अलिखित नियम आजवर चालत आहे . खेड्यापाड्यात हा प्रकार तर ,मेट्रो सिटी मध्ये महिलांना वेळ नाही म्हणून प्रवासात रस्त्यावर जिथे जे काही फास्ट फूड मिळेल ते चमचमीत ,चटकदार खाण्याचा सपाटा असतो. हेही हानीकारक आहे. तेव्हा संतुलित पौष्टिक आहात घेण्यावर महिलांनी भर देण्याची गरज आहे . राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण सांगते ही 50 टक्के स्त्रियांचे हिमोग्लोबिन आठ टक्के किंवा त्यापेक्षा कमी असते .एका बाजूला कुपोषण आणि दुसऱ्या बाजूला खाण्याचा भडिमार त्यामुळे स्थूलत्व आणि वाढलेले वजन असे दूरगामी परिणाम होतात ."पाँलीसिस्टिक ओवरी सिंड्रोम" या आजाराने आज तोंड वर काढले .बहुसंख्य तरुण व मध्यमवयीन महिलांमध्ये प्रमाण वाढले आहे.त्यामुळे वंधत्वसारख्या समस्या वाढलेल्या आहेत .हे सर्व टाळण्यासाठी योग्य आहार पद्धती आणि संतुलित पौष्टिक आहार घ्यावा लागेल .त्यासोबत व्यायामाची जोड ही हवीच ! गृहिणींना किंवा नोकरदार महिलांना वेळेचा अभाव असतो तेव्हा; व्यायामासाठी वेळच मिळत नाही ,हे नेहमीचे पालुपद त्या आळवतात .मात्र त्याची आवश्यकता लक्षात घेऊन प्राधान्यक्रम ठरवावा .महिलांच्या शरीरात बाळंतपणामुळे अनेक बदल होतात. जास्त शरीराची झीज होते .हाडे ठिसूळ होतात .त्यामुळे व्यायामाकडे लक्ष द्यावे. चाळिशीनंतर तर स्त्रियांनी इतरांसोबत स्वतःची काळजी घेतली पाहिजे .कुटुंबाची काळजी आणि स्वतःच्या आरोग्याचा समतोल राखणारी खरी सुपर वुमन होऊ शकते .महिलांनी स्वतःला गौण ,शुल्लक समजू नये. आपले मानसिक स्वास्थ्य उत्तम राहावे यासाठी त्यांनी प्राणायाम ,ध्यान ,आनापानसति ,मैत्री भावना यासारखे ध्यान करावे .स्वतःवर प्रेम करण्यासोबत विकार कमी होईल .मन बळकट होईल.
Comentários