क्वालिटी टाईम !
top of page

क्वालिटी टाईम !

" सॉरी बेटा, आजही मला यायला उशीर झाला"

थोड्याफार फरकाने बहुतेक घरात ऐकायला मिळणारी ही वाक्य आहेत. कळत नकळत किंवा मुलांच्या मानसिकतेला समजून न घेतल्याने का होईना आपण एक जबाबदार पालक म्हणून मुलांकडे दुर्लक्ष करतोय की काय.? या प्रश्नावर मंथन करण्याची वेळ आज आली आहे. त्याला योग्य तो ' क्वालिटी टाईम' न देण्यात आल्याने मुलेही पालकांपासून दूर जात आहेत आणि मग आभासी जगात रमण्याचा ते प्रयत्न करत आहेत.

आभासी विश्वातील पात्र त्याला आई-वडीलांपेक्षा जवळचे वाटायला लागतात आणि आईवडील हळूहळू दूर व्हायला लागतात. आज या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. कारण ही समस्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहे.

आज धावपळीचं युग आहे. कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी दोघांनाही अर्थार्जन करावेच लागते यात काही गैरसुद्धा नाही. पण हे सर्व करत असताना ज्या पिढीसाठी आम्ही हे सगळं कमावतोय तीच आपल्यापासून दूर जात असेल तर.....? हे सर्व अनर्थ टाळायचे असतील तर मुलांना पैशापेक्षाही अमूल्य अशी गोष्ट द्या ती म्हणजे 'क्वालिटी टाईम'.


'इसिडोर-आय-राबी' नावाचा एक प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ होता. पत्रकारांनी त्यांना एकदा प्रश्न विचारला

"तुम्ही एवढे मोठे शास्त्रज्ञ कसे काय झालात, यामागील गमक काय..?"

तेंव्हा ते शास्त्रज्ञ म्हणाले

" माझ्या आईने माझ्यासाठी दिलेला महत्वपूर्ण वेळ..

प्रत्येक आईला आपल्या मुलांचं कौतुक असते. शाळेतून आला की तो काय काय शिकला हे जाणून घेण्याची आईला उत्सुकता असते. त्यामुळे प्रत्येक आईचा हा प्रश्न कायम असतो की तुला आज टिचर ने काय शिकवलं?"

सगळे पत्रकार शांतपणे ऐकत होते.. पुढे राबी म्हणाले

"... पण माझी आई हा प्रश्न मला कधीच विचारत नव्हती. मी शाळेतून घरी आलो की मला ती हातपाय स्वच्छ धुण्यापासून ते जेवणापर्यंत मदत करायची. आणि मग मला ती जवळ घेवून अगदी प्रेमपूर्वक विचारायची "बाळा तू आज टीचर ला कोणता प्रश्न विचारला..?"

आता मला आईचा हा रोजचा क्रम माहित झाला होता. त्यामुळे शाळेत जातांना मी निसर्गात, परिसरात, सभोवार.. चिकित्सक वृत्तीने बघायला लागलो. कारण त्यातुनच मला टीचर ला विचारण्यासाठी प्रश्न सापडायचे. आणि त्यातूनच माझी जिज्ञासू वृत्ती वाढीस लागली. आणि आज मी एक मोठा शास्त्रज्ञ म्हणून तुमच्यासमोर उभा आहे.

या प्रसंगावरून लक्षात येतं थोडा का असेना

मुलांना 'क्वालिटी टाईम' देणं किती गरजेचं असत.

डेस्कार्टीस नावाचा विचारवंत म्हणतो की आपले अस्तित्व आपण जीवनात घेत असलेल्या अनुभवांवर अवलंबून आहे. एका पिढीने जतन केलेले अनुभव दुसऱ्या पिढीपर्यंत पोहचवायचे असेल तर संवाद असणे गरजेचे आहे. आणि संवाद साधण्यासाठी हवा ' क्वालिटी टाईम'.

मुलांना क्वालिटी टाईम उपलब्ध करुन द्यायचा म्हणजे नेमकं काय करायचं..? तर त्यासाठी एका पंचसूत्री चा आधार घ्यावा लागेल..

१) शिकणं आणि शिकवणं

२) चुका आणि शिका

३) जिव्हाळा आणि कृती

४) आनंद आणि अनुभव

५) स्वातंत्र्य आणि स्वैराचार

*१) शिकणं आणि शिकवणं :*

अनेक पालक आज असे आहेत की अमाप पैसा खर्च करुन आपल्या मुलाला शिकवण्या लावू शकतात. पण सगळ्याच गोष्टी शिकवणी वर्गात शिकवल्या जात नाहीत याकरिता पालकांमध्येही जिज्ञासू वृत्तीने शिकण्याची आवड असायला हवी. हस्तकला, चित्रकला, पाककला, भरतकाम विणकाम, वाचन, गायन, वादन, शिल्पकला या व इतरही अनेक गोष्टी आहेत ज्या पालक स्वतः शिकून आपल्या मुलांसमोर आदर्श निर्माण करू शकतात. पालकांच्या या व्यासंगात मुले साहजिकच आकर्षित होतात आणि शिकण्यासाठी प्रेरित होतात.

ओढूनताणून शिकणं शिकवणं ही प्रक्रिया होण्यापेक्षा अशी सहज घडली तर ती आनंददायी आणि सहज शिकण्यायोग्य होते. हासुद्धा मुलांना दिलेला क्वालिटी टाईम च आहे.

*२) चुका आणि शिका :*

चुकातूनच माणूस शिकतो हे गुळगुळीत झालेलं वाक्य सगळ्यांना पाठ आहे. पण मुलांकडून चूक झालीच तर रागवल्याशिवाय वेळप्रसंगी शारीरिक शिक्षा केल्याशिवाय राहत नाही. हे असे का होतं. तर मुलाला समजून न घेतल्यामुळे. आज तो जे काही काम करतो आहे ते पहिल्यांदा करतोय. त्याला रागाच्या शब्दांपेक्षा गरज असते आत्मविश्वास निर्माण करण्याची आणि मार्गदर्शनाची. मग ते अभ्यास असो वा घरातील एखाद्या कामाच्या बाबतीत असो. एक पालक म्हणून त्याची चूक का आणि कुठे झाली हे समजून घेणं महत्वाचं आहे. कोणतेही काम करत असतांना त्या कामात

'परफेक्शन' कसे येईल यासाठी मदत करणं म्हणजे क्वालिटी टाईम

*३) जिव्हाळा आणि कृती*

कुटुंबातील सदस्यांमध्ये एकमेकांप्रती आदर, जिव्हाळा आहे हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले पाहिजे. त्याकरीता पालकांनी आपल्या मुलांसोबत आपल्या सर्व कामाचा व्याप बाजुला सारून निवांत वेळ काढून त्यांच्या सोबत बसलं पाहिजे. एकमेकांशी दिलखुलास गप्पा केल्या पाहिजे. जिव्हाळ्याने एकमेकांची चौकशी केली पाहिजे. शाळा कॉलेज मधील प्रसंगावर चर्चा केली पाहिजे. मिञ मैत्रिणींबद्दल खुलेपणाने बोलले पाहिजे. हा परिवारातील सदस्यांनी एकमेकांसोबत घालवलेला महत्वपूर्ण क्वालिटी टाईम असतो. नाहीतर बरेच घरात असेही चित्रं बघायला मिळते की पालकांच्या सहवासात मुले बोअर होतात,कंटाळून जातात आणि मग इतर मार्ग ते शोधायला लागतात. जे चुकीचे सुद्धा असू शकतात. म्हणूनच पालकांनी हा क्वालिटी टाईम जाणीवपूर्वक काढणे गरजेचे आहे.

*४) आनंद आणि अनुभव*

क्वालिटी टाईम द्यायचा म्हणजे अनेक पालकांचा असाही गैरसमज आहे की मुलांना भरमसाठ पैसे खर्च करुन विविध सोयीसुविधा पुरवणे. पण हे सर्वार्थाने चूक आहे. मुलांवर पैसे खर्च करण्यापेक्षा वेळ खर्च करा. त्यांना आयुष्य आनंददायी पद्धतीने कसे जगता येईल. माणसांच्या जीवनात येणारे चढ उतार, येणारी संकटे, पेलावयाची आव्हाने हे सर्व अनुभव दिले पाहिजे. तेही अगदी सहजपणे.तो सुद्धा क्वालिटी टाईम च असणार आहे.

*५) स्वातंत्र्य आणि स्वैराचार*

क्वालिटी टाईम च्या पंचसूत्रीमधील अत्यंत महत्वाचं सूत्र म्हणजे मुलांना स्वातंत्र्य देणं फार महत्वाचं आहे. बऱ्याच पालकांना वेळ देणं म्हणजे मुलांच्या जवळ बसून राहणं त्यांच्या डोक्यावर बसून त्यांच्याकडून हवी ती कामे करुन घेणं. आणि आम्ही आमच्या मुलांना खूप वेळ देतो हा टेंभा मिरवणं हे संयुक्तिक नाही.

काम करण्याचं स्वातंत्र्य आणि जे काम करण्यात त्याला आनंद मिळतो त्यासाठी प्रोत्साहन देणं, मार्गदर्शन करणे हे सुद्धा क्वालिटी टाईम चे एक महत्वपूर्ण सूत्र आहे. पण स्वातंत्र्य याचा अर्थ असाही नव्हे कि मुलांच्याही हातात मोबाईल आणि पालकांच्याही हाती मोबाईल आणि तुला जे वाटेल ते कर.. मी माझे काम करतो. अशाही प्रकारचे स्वातंत्र्य नसावे. त्यापेक्षा मोबाईलचं वापरायचा असेल तर दोघांनीही मिळून एकाच मोबाईलवर काही शैक्षणिक, मनोरंजक कार्यासाठी वापर केला तर ते अधिक संयुक्तिक ठरेल.

*कोरोना एक संधी* :

खरं तर कोरोना संक्रमण आज वाढतच चालले आहे. शाळा बंद. कार्यालय बंद.. वर्क फ्रॉम होम.. ज्यामुळे विशिष्ट काळासाठी का होईना इच्छा नसतांनाही आज कुटुंबातील सर्व सदस्यांना घरातच बसून राहण्याची वेळ आली आहे. मग याकडे नकारात्मक दृष्टीने न बघता कोरोनाने मुलांसोबत क्वालिटी टाईम घालवण्याची दिलेली संधी असा सकारात्मक विचार करुन पालकांनी मुलाना वेळ दिला पाहिजे. मग बौद्धिक मनोरंजनात्मक खेळ, गप्पा, कुटुंबातील सदस्यांसमवेत छोटेखानी स्पर्धा, प्रत्येकातील कला गुणांना संधी, पाक कला, मुलांच्या वयोगटानुसार पुस्तक वाचन इत्यादी प्रकारे पालकांनी मुलांना वेळ दिला तर हा सुद्धा क्वालिटी टाईमच ठरणार आहे. यामुळे घरात बसूनही मुलांना बोअर तर होणारं नाहीच उलट आईबाबा माझ्यासोबत आहेत हा विश्वास अधिक वृध्दींगत होईल.

आयुष्यात शिकण्यासारख्या अनेक गोष्टी असतात त्या मुलांच्या निमित्ताने आपणही शिकू शकतो. मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्वाचा विकास साधायचा असेल तर गुणवत्तापूर्ण वेळही देणं तेवढंच महत्वाचं आहे.

आज योग्य त्या वळणावर मुलांना क्वालिटी टाईम न दिल्याने मुले वाईट संगतीत गेल्याचे दिसतात. व्यसनांकडे वळतांना दिसतात. पालकांनी जर क्वालिटी टाईम दिला नाही तर मुले आपला वेळ इतर..पण चुकीच्या ठिकाणी देतो. आणि तोच त्याला क्वालिटी टाईम वाटत असतो. कारण क्षणिक का असेना तो प्रसंग, वेळ त्याला आनंद देणारा वाटतो.

आदर्श पालकत्व ही एक कला आहे. सतत करत रहावा असा तो अभ्यास आहे. हा अभ्यास सातत्यानं करत राहून पालकत्वाची कला जाणीवपूर्वक अंगिकारली पाहिजे.

मुले मोठी झाल्यावर ती हाताबाहेर गेलीत, आमचे ऐकत नाहीत, मोठ्यांचा सन्मान ठेवत नाहीत, व्यसनांच्या पूर्णपणे अधीन गेलेली आहेत. अशी सर्व दूषणे देत बसण्यापेक्षा वेळीच मुलांना क्वालिटी टाईम द्या आणि आयुष्यभरासाठी निश्चिंत व्हा...

14 views0 comments
bottom of page