top of page

बुद्धांच्या संस्कारक्षम गोष्टी

बुद्धांच्या संस्कारक्षम गोष्टी (सचित्र)’ हे पुस्तक १२ जानेवारी २०२१ रोजी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण समितीचे माजी अध्यक्ष तसेच जेष्ठ विचारवंत प्रा डॉ आ ह साळुंखे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. वर्धा जिल्हा परिषद येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले सागर शिंगणे यांनी या पुस्तकाचे संपादन केलेले आहे. महाराष्ट्रातील नामवंत प्रकाशन संस्था 'लोकायत प्रकाशन' यांनी हे सचित्र पुस्तक प्रकाशित केलेलं आहे.

पुस्तकाविषयी थोडक्यात....

आपल्या वैशिष्ट्यपूर्ण मांडणीमुळे या सचित्र पुस्तकाची पहिली आवृत्ती एका महिन्याच्या आत संपली. त्यामुळे दि १९ फेब्रुवारी २०२१ रोजी या पुस्तकाची दुसरी आवृत्ती ११ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा जेष्ठ विचारवंत प्रा डॉ बाबुराव गुरव यांचे हस्ते प्रकाशित करण्यात आली. सदर पुस्तकात विविध प्रसंगातील बुद्धांचे उपदेश बालसुलभ गोष्टींच्या माध्यमातून चित्रित करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. पुस्तकातील चित्तवेधक आणि आकर्षक रेखाचित्रे उत्तर प्रदेशातील युवा चित्रकार सूरज सिंग यांनी रेखाटली आहेत. सदर पुस्तक एकूण ५६ पृष्ठांचे असून त्यात एकूण १२ मनोरंजक आणि संस्कारक्षम गोष्टींचा समावेश केलेला आहे. विद्यार्थ्यांना आशयाचे सखोल आकलन व्हावे, यासाठी प्रत्येक गोष्टीच्या शेवटी कठीण शब्दांचे सविस्तर अर्थ देण्यात आलेले आहेत.


पुस्तकाचे वेगळेपण -

बुद्धांच्या जीवनावर, त्यांच्या उपदेशांवर आधारित अनेक पुस्तके आधीच उपलब्ध असताना हे पुस्तक अल्पावधीतच इतके लोकप्रिय का ठरले, या पुस्तकाचे वेगळेपण काय आहे, असा प्रश्न कोणत्याही वाचकास निश्चितच पडू शकेल. बुद्धांच्या जीवनावर, त्यांच्या उपदेशांवर आधारित गोष्टींची अनेक पुस्तके आज उपलब्ध आहेत, पण यातील बरीचशी पुस्तके अनैसर्गिक चमत्कारांनी भरलेल्या आहेत. वैज्ञानिक कसोट्यांवर न टिकणारे, निसर्ग नियमांच्या विरोधात जाणारे कुठलेही चमत्कार बुद्धांना मान्य नव्हते. मानवी जीवन अधिकाधिक सुखी करण्यासाठी आपल्या वागणुकीतील बदल महत्वाचा आहे, अशी त्यांची शिकवण होती. नेमका हाच धागा पकडून सागर शिंगणे यांनी सदर पुस्तकाचे लेखन केलेले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवा यासाठी आवर्जून हे पुस्तक लिहिल्याचे त्यांनी सांगितले. डॉ आ ह साळुंखे यांच्या 'सर्वोत्तम भूमिपुत्र: गोतम बुद्ध' या अभ्यास ग्रंथातील अस्सल, निवडक आणि संस्कारक्षम अशा गोष्टी निवडून त्यांची अतिशय सोप्या भाषेत त्यांनी मांडणी केलेली आहे. सोप्या भाषेतील गोष्टींसोबत असलेल्या आकर्षक रेखाचित्रांमुळे बालकांना ते विशेष रुचल्याचे अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले.

आगामी आवृत्ती आणि हिंदी, इंग्रजी भाषांतराबद्दल

केवळ भारतातूनच नव्हे तर थेट कॅनडा आणि जर्मनीहून पुस्तकासाठी झालेली मागणी अक्षरशः अविश्वसनीय आहे. वाचकांचा उदंड प्रतिसाद आणि वाढती मागणी लक्षात घेता, या पुस्तकाची तिसरी आवृत्ती १४ एप्रिल रोजी प्रकाशित करावी लागेल, असे प्रकाशक इंजि राकेश साळुंखे यांनी बोलताना सांगितले. तसेच पुस्तकाचे वेगळेपण लक्षात घेता या पुस्तकाचे हिंदी आणि इंग्रजी भाषांतर येत्या १४ एप्रिल रोजी वाचकांना देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

एकूणच काय, तर दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन प्रसंगी प्रा डॉ बाबुराव गुरव यांनी म्हटल्याप्रमाणे ''बुद्धांच्या या संस्कारक्षम गोष्टी मुलांचे भावविश्व समृद्ध करतील आणि आगामी काळात या पुस्तकाच्या अनेक आवृत्या निघतील'' हे शब्द खरे ठरत आहेत.

एकूणच काय, तर आपल्या पाल्य आणि विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी आणि एक विवेकी पिढी घडविण्यासाठी हे एक 'मस्ट रीड बुक' आहे....

6 views0 comments

Comments


bottom of page