top of page

“झोपेतली बडबड : रस्ते, गाई आणि कुत्रे”

काळ-पहिला लॉकडाऊन

दृश्य -निर्मनुष्य रस्ते आणि रस्ते चिंताग्रस्त...

हमरस्ता(स्वगत) - खेटुन चालणारी वाहने,आपल्याच मस्तीत जाणाऱ्या गाड्या, रस्त्याच्या मधोमध येणारा आणि घसा फुटेपर्यंत ओरडणारा बाजार,तर्रीSसाठी मरणारी गर्दी गेली कुठे? एका पायावर पूर्ण भार टाकून सवारीला ओढत आणणारा रिक्षावाला गेला कुठे? टोपलीत वीस-पंचवीस निंब विकण्यासाठी दिवसभर मरणारी

म्हातारी गेली कुठे?? .. अरे कोणी सांगणार आहेत का मला? माण्सं रस्त्यावर का येत नाहीयं? ..आपल्या रस्त्याचे काम तर कोणी काढलेले

नाही नां? नाही,आपण एवढे बधिर तर नाही;

आपल्याला जाणवलं असतं.

(टिळकरस्त्याला उद्देशून)

हमरस्ता- टिळक,तुझ्या रस्त्यावरून कुणी जाणं-येणं करत आहेस का रे?

टिळकरस्ता- नाही ना!तू मोठा आणि हमरस्ता म्हणून तुला विचारायला आलो,की तूच तर पळवली नाहीस नां, माझ्या रस्त्यावरची माण्सं?

हमरस्ता- नाहिरे,मलाच गर्दी सहन होत नाही. चालता-चालता वाहनासकट दुकानात घुसतात माण्सं.

मी कशाला पळवू वेड्या... बरं गांधीला विचारतो.तो विरुद्ध दिशेनी आणि लांबून येतो.

(हमरस्ता गांधी रस्त्याला उद्देशून)

हमरस्ता- गांधी, ते जाणं-येणं सुरू आहे काय लोकांचं तुझ्या मार्गावरून?'

गांधीरस्ता- माझा मार्ग लोकांनी कधीचाच सोडला!

हमरस्ता- गांधी,तुझ्या मार्गाला लागून तो कोणता मार्ग आहे?'

गांधीरस्ता- संविधान मार्ग. त्यावरुन देखील कोणीही चालत गेलेले नाही.

हमरस्ता- गांधी,त्या रस्त्याचं नाव काय आहे? तो नाही का,रफीमार्गपासून आत जातो.आधी त्याला मडक्यारोड म्हणायचे. नंतर एक सरकारी आदेश

आला आणि त्याचे नाव बदलले.

गांधीरस्ता- तो सिल्ह्वररोड

हमरस्ता- हां सिल्ह्वर! नाव बदलले, पण हालत मडक्यापेक्षाही खराब आहे,असं सांगत होता रफीमार्ग.काय आहे की,मला जाता येत नाही तिकडे, आपला रस्ता सोडून! ..पण हे गेलेत कुठे??

..देशमुखाच्या गल्लीतले, सखारामच्या चाळीतले, चुडीमोहल्यातले पोट्टे गेले कुठे? घोड्याच्या चौकातली, आबाजीच्या मठातली, गणपतीच्या मंदिरातली,

हाजीच्या दरग्यातली माण्सें गेली कुठे??

.. मातीच्या रस्त्यावरून,रेतीच्या रस्त्यावरून,

मुरमाच्या रस्त्यावरून,डांबरी रस्त्यावरून,

सिमेंटच्या रस्त्यावरून,फरसबंदी रस्त्यावरून,

पेव्हिंग ब्लॉकवरून, फुटपाथवरून, वळणरस्त्यावरून, ब्रीजवरून,अंडरपासवरून वाहनारी,उचंबळत जाणारी, स्वप्न पाहत जाणारी,स्वतःला ढकलत जाणारी माण्सें गेली कुठे??

.येणाऱ्यांना,येऊ इच्छिणाऱ्यांना,जाणाऱ्यांना,जाऊ इच्छिणाऱ्यांना,आलेल्यांना- गेलेल्यांना,चालणाऱ्यांना, पळणाऱ्यांना,धावणार्यांना;धावत जिथे जायचं आहे,

तिथे आम्ही धावलो.काठीसोबत तितकेच हळूवार देखील चाललो. चालता-चालता थकलेली माण्सं मटकन बसली,तिथेच आम्हीही बसलो...आम्हाला भोकं पडेपर्यंत फटाके वाजवणार्यांसोबत नाचलो,पालखीसोबत तल्लीन झालो,जुलूस- मोर्चांसोबत आम्हीही तितक्याच आवेशाने चाललो,अरे दंगलींच्या वेळेस आम्हीही तितकेच हादरलो.. खांदेकर्यांसोबत आम्ही हळवे झालो,कारण गेलेल्याच्या आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्याचं चालणं,मला आणि माझ्या असंख्य नसांना ठाऊक आहे..रस्ते चालण्यासाठी असतात.पण चालणारी माण्सं थांबली की, आम्ही आवंढा गिळतो.आम्हांला ओढ फक्त तुमच्या पावलांची.. ते भरलेले असू दे,वाकडे असू दे,

उफराटे असू दे..,आम्ही बोललो नाही. कटलेल्या बोटांचे, झिजलेल्या तळव्यांचे,एकच पाय घेऊन येणाऱ्यांचेही आम्ही स्वागतच केले.. बुटांचे,बाटांचे, सॅंडलचे, ऊंचटाकांचे,स्लीपरचे,सोल निघालेल्या जोड्यांचे,

रंग उडालेल्या वाहनेचे,दोन रंगांच्या चपलेचे, चिंध्या गुंडाळलेल्या पायांचे..या सर्व सर्व पावलांसाठी आम्ही तितकेच नम्र होतो.नम्र आहोत आम्ही...पण तुम्ही कुठे आहात??

फुलेरोड- भाई,सगळ्याच रस्त्यांना विचारून झालं. कुठल्याच रोडवर माण्सं आली आली नाहीत की गेली नाहीत.

गांधीरस्ता- रस्ते सोडण्यापुर्वी माण्सं आपल्याला सांगून गेली नाहीत. आपणच माणसांशी संवादात कुठेतरी कमी पडलेले असू.

रफीमार्ग- आपली चूक नसतांनाही आपल्या उरावर पडून माण्सं मेली,जी वाचली त्यांनी आपल्यालाच गाली दिल्या. आपण कुठे काही बोललो? .

.आपण ऐकत गेलो. आपण कायम ऐकत असतो..

टागोररोड- आपल्याला न सांगता निघून गेली, याचं कारण आता आपल्याला माहिती नाही.गाव/ शहरातील रस्ते,राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्गांनाही विचारून झाले.. आता दुसऱ्या कुणाला तरी विचारावं लागेल.

टिळकरोड- विचारायला रस्त्यावर आहे कोण? विचारायचं कोणाला?

गांधीरस्ता- गाई आहेत बसलेल्या रस्त्यावर.

हमरस्ता- गाई??..काहीही हं गांधी!.. अरे,त्या रस्त्यावरच बसलेल्या असतात कधीच्या, त्यांना कोण आलं आहे सांगायला?

गांधीरस्ता- तुला रस्त्यावरचंच माहित आहे राज्या!

लोक गाईच्या कानात काही काही सांगत राहतात.

माहिती असेल तर सांगतील.

(दृश्य विभिन्न वयोगटाच्या पंधरा ते वीस गाई बसलेल्या आहेत, एकमेकींकडे पाहत..हमरस्ता एका सीनियर गाईला उद्देशून)

मालन- गेली आठ-दहा दिवसांपासून आपण पाहत आहोत की, रस्त्यावर एकही माणूस दिसत नाही.या शहरातला,शहरातून गावाकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांना, गल्ली-बोळांना,पायवाटांना विचारून झाले.त्या

कोणीही पायी चालणारी माण्से,वाहनांवरून जाणारी माण्से पाहिली नाहीत.. घरात तर असावी, पण रस्त्यावर ती का येत नाही?..

तुला काही माहिती आहे का? तुझ्या मालकाने तरी त्याबद्दल काही सांगितले का तुला??

मालनला हुंदका फुटला आणि ती रडायला लागली.

गांधीरस्ता-शांत हो मालन,काही सांगितले का तुला मालकाने.

मालन-(मालनने शेपटीने डोळे पुसले) कानात सांगायचे दूरच, कानाला भोक पाडून बिल्ला अडकवलाय.त्यालाही दोन वर्षे झाली,तेव्हापासून घरी नेले नाही. घर माहीत असल्यामुळे मी जाऊन पाहते अधून-मधून

नातवंडासहित, तर हाकलून देतो. गळ्यात साधा सुताचा दोर म्हणजे दावं नाही.सडून,पडुन गेलं एकदा. अधून मधून येतो आणि सगळ्यांच्या पोटाकडे पाहून चालला जातो. नुस्तं महिन्यांचं गणित मांडत राहतो.एखादीचे दिवस भरले की घेऊन जातो. दोन-तीन महिन्यानंतर ती पुन्हा वासरासहित आमच्यात येते. आता तर एक दीड महिन्यापासून दिसला नाही.चंद्रीचे दिवस भरत आले,कसं होईन बिचारीचं!! चार-पाच दिवस झाले, खायला काही नाही.लोकांच्या फाटकाजवळ जावं तर, फाटकही उघडल्या जात नाही..

आमच्याकडून खाल्ल्या न जाणारी झाडे,शोधून शोधून लावली माण्सांनी दारासमोर. आहे त्या झाडाचा पालाही आमच्या उंचीपर्यंत खाऊन झाला. मान जास्त वर केल्यास,मान लागुन येते.. कसं होईल या वासरांचं??..

सगळ्या रस्त्यांना वाईट वाटलं. यापूर्वी आपण कधीच

गाईवासरांशी बोललो नाही,हे त्यांना जाणवलं.रस्ता अडवणारी म्हणून केवळ चिडलो,डाफरलो. पण त्यांना खरोखरच खायला लागतं,ते आपण विसरूनच गेलो...

हमरस्ता- पण आता विचारावं कुणाला? माहित तर करून घ्यायचंय.

मालन-कुत्र्यांना विचारा,त्यांना नक्कीच माहिती असेल.

हमरस्ता- ठीक आहे.पण दिसत नाही कुठे?

मालन- ते काय एटीएम मध्ये! त्याना आता जागाच

जागा आहे..

मालन हंबरली,कुत्र्याने कान टवकारले,हमरस्त्याने आवाज दिला.

हमरस्ता- लोक रस्त्यावर दिसत नाही आठ-दहा दिवसांपासून. या रस्त्यावर नाही की, त्या रस्त्यावर नाही. गेले कुठे??

कालू- घरातच आहे नां भाऊ! टीव्ही पाहून राह्यले.

हमरस्ता-अरे पण ते रस्त्यावर का येत नाही?

कालू- येत नाही तं जाऊ द्यानां, बाहेर आले तर गोटेच मारते ना आमाले..आता मस्त आमाले झोपाले भेटून राह्यलं,कमी ऊन हाये का बाह्यरं! येटीएम्मधीच झोप्लो होतो.

हमरस्ता- परंतु एटीएम मध्ये गेला कसा?

कालू- तुम्हाले थेच् तं सांगुन राह्यलो नां. मी येटीएमजवळच उभा होतो,तं एकानं गोटा झण्णावला.

म्या तं हुकवला,पण दाराचा काच फुटला.बस आता डायरेक्ट येन्ट्री..पीननंबर टाकाची गरजच नाही..

हमरस्ता- अरे पण माणसांना झालं काय?

हमरस्ता- तुम्हाले थेच सांगून राह्यलो नां मी.घराच्या बाह्यरं तं निंघून नाही राहिले,पण खिडकीतूनच हाडं हाडं करतेत.

हमरस्ता- अरे,पण मोठी माण्सं तुला मारत नसतील?

कालू- तेयले वाकताच कुठे येते राजेहो गोटे घ्याले!

मंग काडी फिरवते.एकडाव तं फिरवता फिरवता बुढ्याची काडी निसटली.बुढा काडीजवळं गेला.

पन उचलाले वाकताच येत नव्हतं. उभा राह्यला घंटाकभर,म्हणलं पडते आता झांज यिवुन! मंग एका पोरांनं उचलून देल्ली.मी उभाच होतो वासमार्‍या झाडाजवय.

हमरस्ता- अरे पण सगळे विचारात पडलेआहे की,माण्सं घराच्या बाहेर निघत का नाही? त्याचं कारण काय?.. याचा शोध लावायचा आहे. तू काही मदत करू शकतो का कालू?

कालू- बिलकुल करू शकतो. आपले जातभाई आहेना त्येंच्या घरात.जरी थे आपल्याले रिस्पेक्ट नाही देत,तरी तुमच्यासाठी विचारतो.नाहीतं आम्ही तेयले

हुंगतबी नाई.. पण उद्या सकायी जाईन.आता दुपारची वेळ आहे, झोप्ले आहे सबन. माई झोप् मोड केली तुमी माण्सापाई. झोपतो आता,मंग रात्री कल्ला करावे लागते. केला नाही तं दुसऱ्या मोहल्यातले इचारते, सोया था क्या बेS,तेरा आवाजच नयी आया??

भल्या सकाळी कालू दोन नगर ओलांडून एका कॉलनीत गेला. तिथे सर्वांच्या बंगलीत कुत्री होती. एक किंवा त्यापेक्षा अधिक.ती कॉलनी 'कुत्र्यांची कॉलनी' म्हणूनच ओळखली जायची,नाव अर्थात वेगळे होते.एका बंगल्यातील बुलडॉगला कालू दुरूनच दिसला.बुलडॉग भुंकायला लागला.कालू त्याच्याकडेच येतांना पाहून, बुलडॉग अधिकच चेकाळला.

बुलडॉग- भूS ..भूS ..भोS.. भोवंSS.. भय् भोभोSS भक्S भक्S

कालू- चप्.. चुप्..चुप्s

बुलडॉग- भक्S..पळ इथून. कालू- जाSतो. जरा

चुप् राह्यतं का? इचाराचं हाये.

बुलडॉग- काय?

कालू- येवढ्यात तुमी हागाले बाह्यरं नाई आले?

बुलडॉग- भक्.. गावठी,तुला काय करावं लागतं?

कालू- नोको सांगु.अंदर कोन इल्हळुन राह्यलं?

बुलडॉग- नॉन्सेस! साहेब 'ओsम' म्हणत आहे.भक्..चालता हो.

कालू - बरं जातो.पण माण्सं बाहेर का निघत नाही?

ती तुम्हाला घेऊन फिरत का नाही सध्या? तुझ्या साहेबांनी काही सांगितलं का त्याबाबत??

बुलडॉग-तुला अजूनही माहित नाही का मुर्खा?

कोरोना हा नवाच आजार आलेला आहे.तो माण्सांना होतो.म्हणजे एक माणूस दुसऱ्या जवळ गेला तर होऊ शकतो..आपल्याला होऊ नये म्हणून माण्सं घरात आहे. आणि त्यांना सांगितलेलं आहे की अजिबात बाहेर निघू नका.

कालू-माण्सं मरतात का त्यामुळे?

बुलडॉग- नाहीतर काय,अनेक देशातली माण्सं मरत आहे.. आमचे साहेब आणि मॅडम पण घराच्या बाहेर निघत नाही.. हे सगळीकडे सुरू आहे. याला लॉकडाऊन म्हणतात.

कालु-अजुन किती दिवस बाहेर निघणार नाही?

बुलडॉग- सांगता येत नाही पण महिनाभर तरी. काल्या,फूट आता आणि तुही हिंडू नकोस.

कालू- पेट का सवाल ह्यं जानी! म्हनुन हिंडाव लागते.

तुले इथं दुदात कालवून भिस्किट मियते,आमाले गोट्यावर काडी फ्री असतेत..असो तुझं तुला लखलाभ.माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

कालू आठ रस्ता चौकात येतो.तो भुऱ्याला आवाज देतो.भुर्या त्याचा असिस्टंट.मालन तिथेच बसलेली असते. तिच्या पोरी, जावा,नंदा,चुलत्या भवताल असतात. काळाशार 'भाऊ' बेकरीच्या शटरजवळ उभा असतो. त्याने शटरला एकदोन धडका दिलेल्या असतात.

भाऊच्या आसपास 'एयरटेल' असते.तिची टेल जन्माला आल्यापासूनच ऐअरमध्ये असते. बिल्ले आले तेव्हापासून मालकीणबाईने कानात कुर्रSS करून वासराचे नाव ठेवणे बंद केले असते. गाईला बिल्ले वाचता येत नाही. आणि एवढ्या मोठ्या कळपात,कोणाला आवाज कसा द्यायचा प्रश्न असतो.म्हणून कानावर पडेल ते शब्द नाव म्हणून वापरायचे गाईंनी ठरवलेले असते.चंद्रीच्या दुसऱ्या पोरीचं नाव 'एअरटेल' ठेवलं होतं तर मालनच्या सातव्या पोरीचं नाव 'एलआयसी' होतं..सर्व रस्ते आले होते.

कालूने ऐकलेले सर्व सांगितले..रस्ते आताअधिकच विचारात पडली.चंद्री भयभीत झाली.मालनने शेपटी डोळ्याला लावली...

दुसर्‍या दिवशी अचानक संध्याकाळी 'वैकुंठमार्ग' वर एक ॲम्बुलन्स आली.ॲम्बुलन्स सहसा इकडे येत नसे.वैकुंठमार्ग आता अलर्ट झाला.त्याने पाहिले की ही माण्सेच आहे आणि यांनी वेगळेच कपडे घातले आहे. आणला होता,तोही माणूसच होता.चेहरा उघडा नव्हता, करकचून प्लास्टिक मध्ये गुंडाळला होता.वैकुंठ टाईट झाला. एवढे तर वाजवणारेच असतात बाकीचे ?? ..तीन-चार जणांनी त्याला लाकडांवर ठेवले. भक् भक् रॉकेल ओतले आणि पेटवून दिले.ती माण्से चितेपासून चांगलीच दूर झाली.पूर्ण पेटल्याची खात्री करून पाच- सात मिनिटात ती ॲम्बुलन्स निघुन गेली.मडक्याची धारगीर??.. वैकुंठ तोंड फाडून, जाणाऱ्या अम्बुलन्स कडे पाहत म्हणाला.. कालूने दिलेली माहिती त्याला आठवली.तो संदर्भ जोडू लागला. मध्यरात्री कधीतरी त्याला झोप लागली.तेवढ्यात पुन्हा ॲम्बुलन्सचा आवाज आला.ॲम्बुलन्सच्या लाल-पिवळ्या प्रकाशाने अंधार चिरत नेला.वैकुंठची धडधड वाढली. पुन्हा तीन-चार माण्सेच होती आणि ती त्याच कपड्यात होती. ती तीच होती का,हे वैकुंठला समजले नाही.पुन्हा त्यांनी तसेच केले,लाकडांवर ठेवले, रॉकेल ओतले आणि पेटवून दिले.पाच-सात मिनिटे थांबून,आली त्या दिशेने निघून गेली. वैकुंठला आत रात्रभर झोप लागली नाही...त्याला आठवलं, येथे आणला जाणारा मृतदेह वाजत-गाजत रथात आणला जातो. 'गेलेल्याचा' चेहरा कमी आणि हारच जास्त दिसतात. त्यासोबत आलेली माण्से, वाहनांची उसळलेली गर्दी!.. मग गेलेल्यांच्या आठवणी काढतात. यादी करतात.पार्टी अपटूडेट असेल तर, तिथेच निमंत्रणपत्रिका देतात... या सगळ्या पार्श्वभूमीवर आजच्या या दोन प्रकारांनी त्याची बोबडीच वळली. त्याला आता भीती वाटली. सकाळ लवकर झाली पाहिजे,असे त्याला वाटले...पक्ष्यांचा पहाटआवाज आला. आणि तो लगेच हमरस्त्याकडे निघाला. वैकुंठ दिसताच हमरस्ता म्हणाला, 'मला ॲम्बुलन्सचे आवाज ऐकायला आले.पुढे काय झाले?' 'भाई,त्यात तीन-चार माण्से होती.त्यांनी जो ड्रेस घातला होता,तो कुठल्याही

मॉलमध्ये मिळणार नाही. ज्याला आण्ले,त्याला गुंडाळले होते..आडव्या-उभ्या गवर्या नाही,'दिशा कोणती' याचे डिस्कस नाही.शिडी नाही,मटका नाही; ऐसाही जला दिया. भाई,ऐसा कभी देखा नही!...' वैकुंठ म्हणाला.

हमरस्त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि वैकुंठला म्हणाला, 'तू घाबरू नकोस, हिंमत बांध!'..

तो जायला वळणार,एवढ्यात पुन्हा दुरून ॲम्बुलन्सचा आवाज आला.आवाज वाढत गेला. हमरस्त्याच्या उरावरून ॲम्बुलन्स प्रचंड किंचाळत गेली,तेव्हां हमरस्त्याला घाम फुटला.'भाई, हिंमत बांध!मी बघतो.'वैकुंठ म्हणाला.ॲम्बुलन्स युटर्न घेऊन वैकुंठ मार्गाने निघाली...

रुग्णवाहिका,शववाहिनी, सरकारी वाहने आणि पोलिसांच्या गाड्या तेवढ्या रस्त्यावर धावत होत्या.मृत्यूसत्र दिवसेंदिवस वाढतच होते..गाईला अन्न नाही, हिरव्या पानांपर्यंत तोंड पोहोचत नव्हते;नुसत्या काड्याच किती चघळणार.कुत्र्यांचीही स्थिती कठीण होती.चार हात गोटे मारणारे असले,तरी एक हात खायला द्यायचा.याची जाणीव कालुसह असंख्यांना होती...

रस्ते,गाई आणि कुत्रे भयभीत झाले होते.ही विचित्र माण्सें आपण त्यांच्या गुणदोषांसहित स्वीकारली आहेत,त्याची संमिश्र आठवण त्यांना वारंवार होत होती.


पूर्वीसारखीच माणसं रस्त्यावर यावीत,असे त्यांना मनापासून वाटत होते.. रस्ते,गाई आणि कुत्रे पुन्हा आठ रस्ता चौकात जमा झाले,आणि त्यांनी माण्सांना उद्देशून पत्र लिहायचे ठरविले..गाई आणि कुत्र्यांनी लिहिण्याबद्दल असमर्थता दर्शविली.सर्व रस्त्यांनी गांधीरस्त्याकडे बोट दाखविले. गांधीरस्त्याने सुरुवात केली....

पृथ्वीच्या पाठीवरील समस्त माण्सांनो

तुमची जात समूळ नष्ट करायला

उठलाय एक विषाणू,

ज्याला आकार नाही गंध नाही

कुठून आणि कसा आला आहे

याचे खात्रीलायक उत्तर नाही

पाहता पाहता कवेत घेतो आणि

कंठातले प्राण अलगद टिपतो

सरणांच्या रांगाचे हे लालभडक चित्र

नावानिशी रस्ते म्हणून आम्ही जन्माला आलो

तेव्हापासून अनुभवले नाही कधी.

..याचा अर्थ असा नव्हे की इतिहासात

प्रेतांचा खच दिसलाच नाही कधी

प्रत्येक शतकाला असं जीवघेणं स्वप्न पडतंच,

आणि झुंडींची राख होते..

त्याला कारण रणांगण असुदे,

जगावर सत्ता गाजवण्याची भूक असुदे,

धर्म असुदे,वा असुदे एखादी साथीची लाट.

त्यावेळेस प्रेतांचा हिशेब नसतो,

नजरअंदाज असतात अठरा अक्षौहिनी सैन्यांसारखे..

.. या शतकाला पडलेलं हे अघोरी स्वप्न

संपेलच कधी ना कधी

पण या गोलार्धापासून त्या गोलार्धापर्यंत

तुंबलेल्या प्रेतांना,

कुठेतरी तुही जबाबदार होतास आणि आहेस

हे येतंय का लक्षात तुझ्या?

तू आत आणि अवघा निसर्ग नाचतोय आनंदून,

तुझ्या लफ्फेदार गाड्यांच्या टपावर बसून

चिमण्या वाकुल्या दाखवत आहेत,

याचा अर्थ लागतोय का काही तुला?

.. सुटका होईल तुझी..

पण अडकला आहेस तोपर्यंत

दिशांचा विचार करून ठेव..

आम्ही आहोतच बाहेर

तुझी वाट पाहत..

निसर्गरंगांनी तुझ्या वाटा पुन्हा उधळोS

गाईला तिची पोळ खाजवणारा मालक भेटो

वासराला त्याचे लडिवाळ नाव भेटो

कुत्र्याच्या भूंकण्याला खंड पडू नये

या शतकात कधीही....

रस्त्यांनी आनंद व्यक्त केला,कालूने कुंईs कुंईs केले,मालनने डोळ्याला शेपटी लावली...

.......गाईच्या हंबरण्याने मला जाग आली....

7 views0 comments

留言


bottom of page