top of page

जाणून घेऊया दृष्टिदोष

दिसण्याच्या क्षमतेच्या बऱ्याच अंशी अभाव म्हणजे ' दृष्टिदोष ' हि अवस्था म्हणता येईल . दृष्टी सुधारण्यासाठी चष्मा वापरूनही बऱ्याच प्रमाणात दृष्टि बाधित असेल , तर अशा बालकांचा दृष्टिदोष असलेली बालके म्हणून समावेश करावा लागेल . दृष्टिदोषांचे स्वरूप व तीव्रता बालकानुसार वेगवेगळी असते , म्हणूनच दृष्टिदोष असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या दृष्टिदोषाचा प्रकार व तीव्रतेनुसार अध्यापन -अध्ययन प्रक्रियेशी व अध्ययन साहित्याशी कदाचित जुळवून घ्यावे लागेल.


आंतरराष्ट्रीय रोग वर्गीकर (ICD २००6) नुसार " मंददृष्टित्व ते अंधत्व " या सर्वांचा समावेश दृष्टिदोषात होतो. म्हणजेच दृष्टिदोष या संज्ञेत सौम्य व तीव्र मंददृष्टित्व व अंधत्वाचा समावेश होतो. दृष्टिदोषाविषयी चर्चा करताना दृष्टितीक्ष्णतादृष्टिक्षेत्र या घटकांचा विचार केला जातो. अगदी साध्या शब्दात , व्यक्ती ठरावीक अंतरावरून एखादी वस्तू किती स्पष्टपणे पाहू शकते याचा निर्देशक म्हणजे दृष्टितीक्ष्णता होय. सामान्यपणे " स्नेलन तक्ता " वापरून याची मोजणी केली जाते . व्यक्तीची प्रमाणित दृष्टितीक्ष्णता २०/२० ( फुट ) किंवा ६/६ ( मीटर ) असते . एका निश्चित बिंदूकडे पाहत असताना डोळ्यांना " दृश्य "होणारे क्षेत्र म्हणजे " दृष्टिक्षेत्र " होय.

दृष्टिदोषांचे जन्मांध व प्रासंगिक असे वर्गीकरण करता येते . जन्माच्या वेळेसच असणारी दृष्टिहीनता म्हणजे जन्मांधता होय ; तर प्रासंगिक अंधत्व म्हणजे जन्मानंतर आजार वा अपघातामुळे येणारे अंधत्व होय .नवीन कौशल्ये व संकल्पना आत्मसात करण्यामध्ये अंधत्वाची सुरुवात होण्यापूर्वीचे बालकाचे वय व विकासाचा स्तर यांचा खूप प्रभाव पडतो . त्यामुळे जन्मांध विद्यार्थ्यांना संकल्पना आत्मसात करण्यात अडचणी येऊ शकतात, तर प्रासंगिक अंधत्व आलेल्या विद्यार्थ्यांना पूर्वीची दृष्टी व मिळालेले पूर्वीचे दृक अनुभव यांचा फायदा मिळू शकतो .

हो गोष्ट ध्यानात घेणे गरजेचे आहे की दोन विद्यार्थ्यांचे वैद्यकीय निदान व दृष्टितीक्ष्णता सारख्या असल्या तरीही ते विविध पद्धतींनी अध्ययन व कार्य करतात .

आपल्या वर्गात दृष्टिदोष असणारे असेही विद्यार्थी असू शकतील कि ज्यांना दृष्टिदोष असणारे बालक म्हणून ओळखले गेलेले नाही .खालीलपैकी काही दर्शक आपल्याला वर्गातील दृष्टिदोष असणारे बालक ओळखण्यास मदत करतील व या बालकांना गरज असल्यास त्या सेवा मिळवून देण्यात मदत करता येईल .


बालकांमधील नेत्रदोषाची चिन्हे – शारीरिक लक्षणे

· काही दिवसांपेक्षा अधिक काळ डोळ्यांचा कडा लाल असणे , कठीण कवचासारखे वा सुजलेले डोळे

· जळजळणारे डोळे वा वरचेवर डोळ्यातून पाणी येणे .

· पुन्हा पुन्हा येणारी रांजणवाडी.

· डोळे (बुबुळे ) सरळ एका रेषेत नसणे ( तिरके दिसणे , दोन्ही डोळे एकाच ठिकाणी केंद्रित न होणे .

· बुबुळात पांढरा अथवा करडा रंग असणे .

· वर , खाली किंवा बाजूला फडफडणारे डोळे .

· फुगीर डोळे

· खाली ओघळणारी / पडणारी पापणी

· प्रकाशास नेहमीच संवेदनशील असणारे डोळे

· तिरळेपणा , डोळे चोळणे , एक डोळा बंद करणे .

· एक किंवा दोन्ही डोळे आत किंवा बाहेर वळलेले असणे .

· डोळे सामान्यपणे जसे दिसतात , तसे न दिसणे .


बालकाच्या वर्तनातून दिसणारी लक्षणे :

· बालक नेहमी डोळे दुखणे , खाजणे , वा अस्वस्थेतेची तक्रार करते .

· सातत्याने चेहऱ्याजवळ अक्षरे धरून वाचन करणे .

· अस्पष्टता दूर करण्याचा सातत्याने प्रयत्न करणे .

· वरचेवर डोळे चोळणे .

· चिडचिडेपणा .

· दृक कार्य करताना एक डोळा बंद करणे अथवा झाकून घेणे .

· काहीतरी पाहताना मस्तक तिरके झुकवणे वा वळवणे .

· नीट दिसण्यासाठी पुढे झुकणे .

· डोळ्यांची अती जास्त उघडझाप करणे .

· प्रकाशाप्रती अनावश्यक संवेंदनशीलता .

· अधिक काळ दृष्टीच्या जवळ धरून करावयाच्या कामांमुळे येणारा चिडचिडेपणा.

· वस्तूंवर आदळणे वा अडखळणे.

· कुठेही सहजगत्या न जाता येणे .

· फलकावरील अक्षरे वाचण्यात अडथळा येणे .

· वाचताना ओळीचा निदर्शक म्हणून ओळीखाली बोट ठेवणे .

9 views0 comments

Comments


bottom of page