top of page

कलाकृतीचे नाव :- गृहशोभेची वस्तू (टेबल शोपीस)

लागणारे साहित्य :- नारळाच्या करवंट्या ( एक अर्धगोलाकार वरती निमुळते टोक असलेली करवंटी व इतर 1 किंवा दोन जश्या असतील तशा पसरट आकाराच्या करवंट्या किंवा करवंटीचे तुकडे ) व्हाईट पेन्सिल किंवा खडू, करवत पट्टी (आरी/हॅकसा ब्लेड), हार्ड पॉलिश पेपर 80 नंबर, सॉफ्ट पॉलिश पेपर 120 नंबर,फेव्हीकॉल, एम-सिल, फेविक्विक, नारळावरील केसरी (तंतुमय आवरण),अक्रेलीक रंग किंवा तैल रंग, लवचिक अल्युमिनियम तार अंदाजे एक फूट, हाताच्या करंगळीच्या जाडीची अंदाजे 10 इंच लांबीची सुकलेली फांदी,पेंटिंग राउंडब्रश नंबर 5 ,प्लायवूड किंवा माउंटबॉर्ड चा 10×15 सेमी आयताकार तुकडा किंवा कडक पुठ्ठा इत्यादी.


कृती :- प्रथम आपल्याकडे उपलब्ध असलेल्या करवंट्यापैकी आकाराने गोलाकार- वरती टोकदार अशी करवंटी घ्या. तिला आतून पॉलिश पेपर ने स्वच्छ करून घ्या.तिचा वरील टोकदार असलेल्या भागावरील आवरण जसे आहे तसेच राहू द्या.आता आपल्याकडील साहित्यापैकी नारळावरील तंतुमय केसरी घ्या.अर्धगोलाकार करवंटीच्या बाहेरील भागावर फेव्हीकॉल लावून घ्या आणि त्यावर तंतुमय केस करवंटीच्या वरील बाहेरील बाजूच्या सर्व दिशेने व्यवस्थित चिकटवून घ्या व ते सुकण्यास ठेवा.करवंटीवर तंतुमय आवरण आवश्यकता वाटल्यास पुन्हा एकदा करवंटीवर वरील सर्व बाजूने तंतुमय केस चिकटवून घ्या आणि पुन्हा सुकण्यास ठेवा.फेव्हीकॉल पूर्णपणे सुकल्यावर आपण चिकटवून घेतलेले तंतू कमी-जास्त लांबीचे असल्यास कात्रीच्या मदतीने व्यवस्थित प्रमाणात कापून घ्या.त्यानंतर आता साधारणपणे आपल्या हाताच्या करंगळी एवढ्या जाडीची झाडाची सुकलेली फांदी घ्या तिच्यातून सरळ असणारा भाग 6 इंच लांबीचा भाग हॅकसा ब्लेड ने कापून घेऊन नंतर हार्ड पॉलिश पेपर ने घासून गुळगुळीत करा.घासून घेतलेल्या फांदीचे एक टोक तंतुमय केसरी चिकटवून घेतलेल्या करवंटीच्या आतील मध्यमागी चिकटविण्यासाठी फेव्हीक्विक चा वापर करा.नंतर दुसऱ्या करवंट्या घ्या त्यातून आपल्याला खुर्चीसाठी बसण्याचा आणि पाठीसाठीचा असे दोन- दोन भाग कापून घ्यायचे आहेत.करवंटीवर त्यासाठी खडू किंवा व्हाईट पेन्सिलने 3×5 सेमी चे आयताकार भाग रेखाटन करा आणि हॅकसा ब्लेड ने कापून काढा.त्याच्या कडा आणि दोन्ही भाग आधी हार्ड व नंतर सॉफ्ट पॉलिश पेपर ने घासून काहीसे गुळगुळीत करा.त्यानंतर अल्युमिनियमची लवचिक तार घेऊन तिला आवश्यक त्या प्रमाणात कापून हॅकसा ब्लेड ने कापून घ्या.तार कसा घ्यावा,त्याची रचना कशी करावी इत्यादी सर्व छायाचित्राचे निरीक्षण करून आपल्या लक्षात येईल. छायाचित्रात दाखवल्याप्रमाणे कृती करा.तारेच्या याच बेसवर आपल्याला खुर्ची फिक्स करायची आहे.तार करवंटीला चिकटवून घेण्यासाठी फेव्हीक्विक चा वापर करा.(खुर्चीसाठीचे भाग तार वर फिक्स करतांना बसण्यासाठीच्या भागासाठी करवंटीचा कापलेला भाग उलट बसवा तर पाठीमागच्या भागासाठी करवंटीचा भाग त्याउलट चिकटवून घ्या.) आता आपल्याकडे करवंटीवर चिकटवून घेतलेले-मध्यभागी फांदी असलेली छत्री स्वरूपात एक वस्तू आणि दोन खुर्च्या तयार झालेल्या आहेत.आता 10×15 सेमी आकाराचा प्लायवूडचा तुकडा (हे ही उपलब्ध नसल्यास माउंटबॉर्ड किंवा फक्त छत्री घट्ट उभी करता येईल एवढया आकाराचा म्हणजे किमान 5×5 सेमी आकाराचा चौरसाकार फळी किंवा प्लाय चा तुकडा किंवा पुठ्ठा यांचा वापर करता येईल.) प्लायवूडच्या मध्यभागी तयार केलेल्या छत्री चे खालचे टोक फेव्हीक्विक ने चिकटवून घ्या आणि त्याचबरोबर तिथे एम-सिल चा देखील जोड द्या, अश्याच प्रकारे छत्रीच्या आत मध्ये पण मध्यभागी जिथे फांदीचे वरचे टोक जोडले आहे तिथे पण एम-सिल चा जोड द्या म्हणजे ते कायमस्वरूपी घट्ट राहील.आता खुर्च्या छत्रीच्या दोन्ही बाजूला व्यवस्थित प्रमाणात ठेवा आणि खुर्च्याखालील तारचे चारही टोके फेव्हीक्विक ने प्लाय वर चिकटवून घ्या.अधिक आकर्षकतेसाठी तार रंगाने रंगवून घ्या.

अश्याप्रकारे करवंटी,फांदी आणि अल्युमिनियम तार चा वापर करून गृहशोभेची आकर्षक वस्तू आपणांस तयार करता येईल.

टाकाऊ करवंटीचा कौशल्यात्मक पुनर्वापर करून अल्पखर्चात आपण करवंटीपासून शोभिवंत कलाकृतीची निर्मिती म्हणजे गृहशोभेची वस्तू-कलाकृती या पद्धतीने तयार करू शकतो.

कृती करतांना घ्यायची काळजी :- करवत पट्टी (आरी/हॅकसा ब्लेड) ने करवंटी कापताना हाताच्या बोटांना इजा होणार नाही याची दक्षता घ्यावी.10 वर्षाखालील बालकांनी आपल्या शिक्षक/पालक यांच्याकडून करवंटी कापून घ्यावी.त्याचप्रमाणे फेविक्विक चा वापर करतांना देखील काळजीपूर्वक करावा.

छायाचित्रात दाखवलेली कलाकृती ही नमुनादाखल तयार केलेली असून दिलेल्या कृतीनुसार आणि कोणत्याही मशीनचा वापर न करता केवळ सराव आणि हस्तकलाकौशल्यातून तयार केलेली आहे.सातत्य व कौशल्य यातून अशी कलाकृती साकार होऊ शकते.आपण याप्रमाणे आपल्याला आपल्या कल्पकतेने कृती करून अधिकाधिक सुबक,रेखीव,आकर्षक अशी कलाकृती सहज साकारता येईल.

20 views0 comments

Комментарии


bottom of page