लागणारे साहित्य :- नारळाच्या करवंट्या (गोलाकार किंवा पसरट जश्या असतील तशा करवंट्या ) व्हाईट पेन्सिल किंवा खडू, करवत पट्टी (आरी/हॅकसा ब्लेड), हार्ड पॉलिश पेपर 80 नंबर, सॉफ्ट पॉलिश पेपर 120 नंबर, एम-सिल, फेविक्विक, अक्रेलीक रंग किंवा तैल रंग, पेंटिंग राउंडब्रश.
कृती :-प्रथम आपल्याकडे उपलब्ध असलेल्या करवंट्याचे निरीक्षण करा त्यातून आपणांस कोणत्या करवंटीचा आकार कासवाच्या पाठीसाठी योग्य ठरेल याचा कल्पक विचार करा.निवडलेली करवंटीवर पांढऱ्या खडूने किंवा व्हाईट पेन्सिलने अंडाकृती किंवा काहीसे गोलाकार अश्या वर्तुळाचे रेखाटन(मार्किंग) करा.आता करवत पट्टी घेऊन रेखाटन केलेला करवंटीचा भाग व्यवस्थित काळजीपूर्वक कापून घ्या.रेखांकन केलेल्या रेषेनुसार करवत पट्टीने कापल्यानंतर अंडाकृती- वर्तुळाकार आकाराच्या कडा काहीश्या ओबडधोबड,अव्यवस्थित वाटल्यास कडांच्या बाहेरच्या बाजूने हार्ड पॉलिश पेपर घासून त्या व्यवस्थित करा त्याचबरोबर करवंटीचा कापून घेतलेला भाग आतून आणि बाहेरून देखील घासा.पॉलिश पेपर ने करवंटी घासतांना आधी त्या करवंटीवरील तंतुमय भाग- केसरी निघून जातांना दिसेल आणि हळूहळू करवंटीवरील चिकटलेला खरखरीत वाटणारा बराचसा भाग बराचसा निघून जाईल.थोड्या अधिक प्रयत्नांनी-श्रमांनी करवंटीचा उर्वरित असणारा खरखरीत भाग निघून जातो त्यानंतर सॉफ्ट पॉलिश पेपर घेऊन पुन्हा एकवार करवंटीचा भाग घासून घेतल्यास तो पूर्णतः गुळगुळीत झालेला दिसेल.प्रारंभिक वेळी कृती करून पाहतांना करवंटी खूप श्रमाने गुळगुळीत करण्याचा अट्टाहास न करता जेवढी शक्य तेवढी जरी घासता आली तरी प्रतिकृती तयार करण्यात कसलीही अडचण येत नाही.नंतर करवंटी एका पसरट फळी किंवा पुठ्यावर किंवा जमिनीवर ठेवा आणि आपल्या कल्पकतेने कासवाचे तोंड करवंटीच्या कोणत्या दिशेला/कोणत्या कडेवर त्याचप्रमाणे त्याचे चारही पाय आणि शेपूट इत्यादी अवयव व्यवस्थित प्रमाणात कसे दिसतील याचा समर्पक -कल्पक विचार करून त्यानुसार करवंटीच्या आतल्या भागावर तशी मार्किंग करून ठेवा.यानंतर एम-सिल घ्या त्याचे दोन्ही कंटेंट सारखे घेऊन ते हाताने एकजीव करा आणि त्यापासूनच कासवाच्या तोंडासाठी आधी अंदाजे खेळण्यातल्या गोटीच्या आकाराएवढा एम-सिल चा गोळा घ्या आणि त्याला जिथे आपण करवंटीवर तोंडासाठी मार्किंग करून घेतली आहे तिथे आधी चिकटवून घ्या आणि लागलीच त्याला आपल्या हाताने तोंडाचा आकार द्या. तसेच डोळ्यांसाठी देखील एम-सिल चा छोटासा भाग वापरा आणि डोळ्यांच्या ठिकाणी व्यवस्थित चिकटवून घ्या.याच पद्धतीने कासवाच्या चारही पायांसाठी आणि शेपटी यासाठी कृतीचा अवलंब करा.(आकृती वरून आपणास कल्पना येईल).जोड दिलेले भाग घट्ट चिकटण्यासाठी किमान 20 ते 30 मिनिटे पूर्णपणे सुकू द्या.त्यानंतर आपली कासवाची प्रतिकृती त्याच्या आवयवांसह घट्ट झालेली दिसेल.आता प्रतिकृती हुबेहूब दिसावी यासाठी कासवाच्या पाठीवर षटकोनी आकाराचे छोटे छोटे भाग एकाजवळ दुसरा अशी रचना करून आपल्याला हव्या त्या तैल रंग/अक्रेलीक रंग याचा वापर करून रेखाटन करा तसेच कासवाच्या तोंड,डोळे,पाय या अवयवांवर देखील रंग द्या.प्रतिकृती अधिक आकर्षक वाटावी,अधिक सुबक दिसावी म्हणून आपल्या कल्पकतेचा वापर करा आणि रंगवा. आणि रंग सुकू द्या. पूर्ण सुकल्यानंतर आपल्याकडे टाकाऊ करवंटीच्या पुनर्वापरातून अल्पखर्चात स्वनिर्मित अशी कासवाची प्रतिकृती तयार झालेली असेल. टाकाऊ करवंटीचा कौशल्यात्मक पुनर्वापर करून अल्पखर्चात आपण करवंटीपासून शोभिवंत कलाकृतीची निर्मिती म्हणजे कासवाची प्रतिकृती या पद्धतीने तयार करू शकतो .
कृती करतांना घ्यायची काळजी :- करवत पट्टी (आरी/हॅकसा ब्लेड) ने करवंटी कापताना हाताच्या बोटांना इजा होणार नाही याची दक्षता घ्यावी.10 वर्षाखालील बालकांनी आपल्या शिक्षक/पालक यांच्याकडून करवंटी कापून घ्यावी.त्याचप्रमाणे फेविक्विक चा वापर करतांना देखील काळजीपूर्वक करावा. छायाचित्रात दाखवलेली कलाकृती ही नमुनादाखल तयार केलेली असून दिलेल्या कृतीनुसार आणि कोणत्याही मशीनचा वापर न करता हस्तकलाकौशल्यातून तयार केलेली आहे.
Comentários